भाईंदर : नागरिकांशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु अनेकांना या सेवांचा लाभ कसा घ्यायचा, त्याची लिंक कशी मिळवायची याची माहिती नसते. यासाठी महापालिकीन एक क्यूरआर कोड जारी केला आहे. क्यूआर कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन केल्यावर महापालिकेच्या सर्व ऑनलाइन सेवा आपोआपच उपलब्ध होणार आहेत. हा क्यूआर कोड सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.
नागरिकांशी संबंधित महापालिकेच्या अनेक सेवा असतात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत या बावन्न सेवा येतात. त्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा विभागाकडून नवीन नळजोडणी, जलवाहिनी दुरुस्ती, मीटर नादुरुस्ती, जोडणी स्थलांतर, पाणी देयक अशा सोळा सेवा दिल्या जातात. मालमत्ता कर विभागात, नवीन कर आकारणी, मालमत्ता कर हस्तांतरण, खाते उतारा, कराचे देयक, नावात दुरुस्ती अशा बारा सेवा दिल्या जातात, याशिवाय जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला, नगररचना विभागाकडील भाग नकाशा, झोन दाखला आदी सेवाही महापालिकेकडून दिल्या जातात. या सेवा घेण्यासाठी आधी नागरिकांना महापालिकेच्या विविध विभागात फेऱ्या माराव्या लागत होत्या. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी यावर्षीच्या सुरुवातीलाच महापालिकेने विविध ५० प्रकारच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या.
सेवांचा लाभ घेण्यासाठी www.mbmc.gov.in व rts.rtsmbmc.in या दोन लिंक महापालिकेने नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतू अनेकांना या लिंकची माहिती नाही किंवा लिंक टाईप करताना चूक झाली तर त्याचा लाभ घेता येत नाही. हल्ली अनेक आर्थिक व्यवहार क्यूआर कोड स्कॅन करुन अगदी सुलभ पद्धतीने पार पडतात. त्यामुळे क्यूआर कोड पद्धत नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे व ती अधिक सोपी आहे. त्यामुळे महापालिकेने देखीला पल्या ऑनलाईन सेवांच्या लिंकसाठी क्यूआर कोड तयार केला आहे.
क्यूआर कोड मोबाईलमध्ये स्कॅन केल्यानंतर नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. त्यानंतर प्रत्येक वेळी क्यूआर कॊड स्कॅन केला की या सेवा नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहेत. क्यूआर कोड नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचावा, यासाठी हा क्यूआर कोड शहरातील दुकानांवर, व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी त्याचप्रमाणे रहिवासी संकुलाच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात येत आहे. नागरिकांनी ५० सेवांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात न येता हा क्यूआर कोड स्कॅन करावा व सेवांचा लाभ घ्यावा.
