पनवेल : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. पनवेल तालुक्यातील उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नितेश राणे आले असता त्यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजाकडेच व्यवहार करण्याची शपथ देत, मुस्लिमांना हिरवा साप ठेचण्याची भाषा केली. यावर एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर नितेश राणेंचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नितेश राणे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना लपविण्यासाठी राज्यात हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून दंगली घडविण्याच्या तयारीत आहे. यासाठी राणे पिता पुत्रांवरील अखंड देशाचे नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाल्यामुळे अखेर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा नवा डाव नितेश राणे याने आखला. यासाठी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या रामगिरी महाराज या भोंदू बाबाचा विषय चर्चेत आल्यानंतर भाजपचा आमदार नितेश राणे याने अहमदनगर येथे जावून भोंदू बाबाची पाठराखण करत, मुसलमानांना मशिदीत घुसून मारण्याची भाषा करून दोन्ही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण केला असल्याचा आरोप देखील हाजी शाहनवाज खान यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला.
यावेळी हाजी शाहनवाज खान यांनी दोन्ही समाजामध्ये द्वेष पसरू नये यासाठी नितेश राणे यांचे डाव जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगताना, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून ढेकरही न देता हजम करण्याचा प्रकार केला असल्याचे सांगितले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *