2 हजार रुपयांची भीक नकोचे पालिकेला दिले पत्र
उल्हासनगर – सेवानिवृत्त कर्मचारी दुर्धर आजारांनी ग्रस्त असून असंख्य घरगुती अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाप्रसंगी मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय? अशी हाक शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला दिली होती.
मात्र पालिकेने या हाकेला प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या सेवनिवृत्तांनी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आंदोलन पुकारले आहे.
1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील अनुदेय ठरणारी थकबाकी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्याचा शासन निर्णय असताना उल्हासनगर महानगर पालिकेने पाच वर्षानंतर फेब्रुवारी 2023 पासून दर महा दोन हजार रुपये याप्रमाणे ती प्रदान करणे सुरू केले आहे.
सेवनिवृत्तांची फरकाची थकबाकी, निवृत्ती उपदान व निवृत्ती वेतन या सर्वांच्या फरकाची एकत्रित 5 ते 10 लाख रुपये होते.पण ती एकरकमी देण्याऐवजी 2 हजार रुपये प्रतिमाह देण्यात येत आहे. आता या तुटपुंज्या रकमेची आम्हाला भीक नको असे पत्रच सेवनिवृत्तांनी महानगरपालिकेला दिले आहे.
हे सेवानिवृत्त कर्मचारी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आणि राज असरोंकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तानाजी पतंगराव, बाळासाहेब नेटके, नंदलाल समतानी, उमेश ठाकूर, अरुण जाधव, विलास सावळे, रतन दंडगव्हाळ, राकेश रॉय, सुंदर गजवानी, भगवान कुमावत, डी. एल. मगर, मनोहर पानसरे, भागवत पाटील, वामन सोनोने आदी बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू करणार आहेत.
