नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी उत्सवाच्या दहाव्या दिवशी 7846 घरगुती व 589 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 8435 श्रीगणेशमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये 896 शाडूच्या श्रीमूर्तींचा समावेश होता.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बनविण्यात आलेल्या मोठ्या व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करीत श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप दिला तसेच श्रीगणेशभक्तांचे स्वागत केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच अति.आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व इतर विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार संजीव नाईक व अनेक माजी नगरसेवक यांनी व्यासपीठास भेट दिली.
महानगरपालिकेच्या वतीने सर्वच विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दुपारपासूनच मोठ्या संख्येने मूर्ती विसर्जन होते अशा कोपरखैरणे धारण तलावावरील नवीन यांत्रिकी तराफा तसेच क्रेन सुविधेची पाहणी केली तसेच इतर विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांना भेटी देत व्यवस्थेची पाहणी केली होती व मौलिक सूचना केल्या. या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली.
अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था ठेवण्यात आली होती. यामध्ये 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स तसेच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत होते. पोलीस यंत्रणा सर्व विसर्जन स्थळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज होती. सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले होते. श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले होते व विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी व प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. भक्तजनांना श्रीमूर्तींची निरोपाची आरती व सांगता पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी टेबलची व्यवस्थित मांडणी करण्यात आली होती. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जन स्थळांवर तसेच परिमंडळ 1 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले.
नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे “सुके निर्माल्य” टाकण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेण्यात आले. त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 6381 घरगुती तसेच 578 सार्वजनिक मंडळांच्या 6959 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 137 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1465 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 1476 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 7846 घरगुती व 589 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 8435 श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन सातव्या दिवशी सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 896 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
यामध्ये – बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1177 घरगुती व 32 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 163 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 711 घरगुती व 47 सार्वजनिक तसेच 172 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 66 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 626 घरगुती व 94 सार्वजनिक तसेच 110 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 48 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 702 घरगुती व 66 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 264 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले.
कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 862 घरगुती व 103 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 335 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1248 घरगुती व 104 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 118 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 759 घरगुती व 52 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 203 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 296 घरगुती व 80 सार्वजनिक तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 100 घरगुती व 5 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 159 विसर्जन स्थळांवर 8435 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महिनाभरापूर्वींच गणेशोत्सवासंबधी आढावा बैठकीप्रसंगी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याबाबत नागरिकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसून आला. अनेक नागरिकांनी पीओपी ऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास पसंती दर्शविली. शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करणा-या गणेशभक्तांना स्वच्छता व पर्यावरणमित्र म्हणून महानगरपालिकेमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सर्व विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले.
नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 137 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली.
नागरिकांकडून मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील श्रीमूर्ती विसर्जन उत्तम रितीने निर्विघ्नपणे पार पडले असून अनेक नागरिकांनी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्यास पसंती दर्शविली.
