बुलढाण्यात आयोजित माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना योजनेचा लाभ देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अंजित पवार.

बुलढाणा : शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे इनाम घोषित केले होते.त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला. विरोधकांनी सत्ताधारी महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या विधानाबद्दल आज अजित पवारांनी बुलढाण्यातील कार्यक्रमात गायकवाडांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समोर खडेबोल सुनावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अंजित पवार यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण कार्यक्रम बुलढाण्यात गुरुवारी (१९ सप्टेंबर) पार पडला. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड यांचीही उपस्थिती होती.

आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, “मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या साक्षीने सांगेन. प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. पण, कुठलाही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळवीरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात.”

“आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतो. कुठेही वेडेवाकडे विधान करून कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नका. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण, राग व्यक्त करताना काही मर्यादा असतात. त्यासंदर्भात कुठली भाषा वापरली जाते?”, अशा शब्दात अजित पवारांनी फटकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *