पुस्तक परीक्षण
प्रशांत सावंत
मु.पो. १०, फुलराणी, कोंडाबाईची कॉलनी हे मॅजेस्टिक कोठावळे यांचे नवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकाचे शब्दांकन विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे सचिव रमेश लक्ष्मण पारधे यांचे बंधू सिध्दार्थ लक्ष्मण पारधे यांनी केले आहे. गरीबीत कष्टं करून आपल्या परिवाराला सुखाची वाट तयार करून देणारी आई कशी असते याचा साक्षात्कार सदर पुस्तकातल्या प्रत्येक पानावर होतोच होतो. आपल्या परिवारासाठी आशेची कुठलीही किरणं दिसत नसतानाही धडपडणारी आई खरंच एक देवाचं रूपच असू शकते याची प्रचिती हे पुस्तक वाचताना हमखास येतेच. वांद्रयाच्या साहित्य सहवासमधल्या मोठ- मोठ्या लेखकांच्या घरी भांडी घासायचं काम करणाऱ्या सिध्दार्थ पारधे यांच्या आईने त्याच विख्यात लेखकांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षण पध्दतीकडे बघून स्वतःच्याही मुलांना सुशिक्षित करण्याचं स्वप्नं तिथेच बघितले होते. तिलाही वाटायचं की आपली मुलंही शिकून सवरून मोठी झाली पाहिजेत. त्या माऊलीने आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी कसे अपार कष्ट घेतले याचे सुंदर वर्णन सदर पुस्तकात वाचायला मिळते. एक प्रकारे हे प्रेरणा देणारे पुस्तक आहे. आजच्या टेक्नॉलॉजीचा जगात वावरणाऱ्या आणि ज्यांना आपल्या पालकांकडून सगळे काही सहज प्राप्त होत असतं अशा आत्ताच्या पिढीला हे पुस्तकं वाचण्यासारखं आहे. आई काय असते, ती हलाखीची परिस्थिती असतानाही आपल्या मुळां- बाळांसाठी काय करू शकते आणि ती आपल्या घराची दिशा सुखाच्या वाटेपर्यंत कशी पोहचवू शकते याचं जिवंत असं कथन या पुस्तका- तल्या प्रत्येक पानावर वाचायला मिळते. १६८ पानांच्या या पुस्तकात सिध्दार्थ लक्ष्मण पारधे यांनी शब्दांकन केलेल्या प्रत्येक कथनात त्यांच्या आईची वैशिष्ट्य, तिची घरासाठीची तळमळ अक्षरश: डोळ्यासमोर उभी राहते. वांद्रयातल्या साहित्य सहवासमधला एकूणच प्रवास या पुस्तकात उलगडला गेला आहे. साहित्य सहवासमधली माणसं किती प्रेमळ, किती प्रामाणिक होती याबाबत सदर पुस्तकात अगदी उदाहरणांसहित लिहिलं गेलं आहे. यातली काही उदाहरणं वाचताना खरंच मन भरून येतं. ज्या साहित्य सहवासमध्ये तिथल्या इमारती उभ्या रहात असताना तिथेच विटा उचलण्याचं काम, घमेली भरून नेण्याचं काम करणाऱ्या पारधे परिवाराने शेवटी त्याच कॉलनीत घर घेतले. हा इतका यशस्वी प्रवास केवळ आणि केवळ त्यांच्या आई कोंडाबाई लक्ष्मण पारधे यांच्या मेहनतीमुळे आणि चांगल्या संस्कारामुळेच घडू शकला. सदर पुस्तक अशा प्रसंगांमुळेच खूपच वाचनीय झालं आहे. आजच्या पिढीने हे पुस्तक जरूर वाचावे. एका कष्टाळू आणि मेहनती आईकडून प्रेरणा घ्यायची असेल तर मु.पो. १०, फुलराणी हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.
