4 हजारहून अधिक नागरिकांनी राबविले महास्वच्छता अभियान

नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटमध्ये लोकसहभागातून नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नमुंमपा व एपीएमसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवक, विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी 4 हजारहून अधिक मोठया संख्येने सहभागी होत हे भव्यतम अभियान यशस्वी केले.
यामध्ये विशेषत्वाने विविध महाविद्यालयांचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याप्रमाणे एपीएमसी मार्केटमध्ये काम करणा-या माथाडी कामगारांनी ते ज्या मार्केटमध्ये काम करतात तेथील स्वच्छता मोहीमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतामित्र तसेच एपीएमससी मार्केट्सचे स्वच्छताकर्मी यांनीही अभियान यशस्वी करण्यात योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभागी झाले.
एपीएमसी मार्केट मधील कांदा बटाटा मार्केट येथे अभियानाचा शुभारंभ करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची सामुहिक शपथ ग्रहण करीत स्वच्छतेस प्रारंभ केला. भाजीपाला मार्केट, फळ बाजार, मसाला मार्केट, दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये सखोल स्वच्छता मोहीम व्यापक जनसहभागातून राबविण्यात आली.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक लोकसहभागावर भर देत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवितांना त्यामध्ये विद्यार्थी सहभागावर भर दिला जात आहे. या महास्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेच्या वतीने मॅकेनिकल स्विपींग मशीन, जेटींग मशीन, डस्ट सप्रेशन व्हेईकल, सक्शन युनीट, जेसीबी, डम्पर, कचरा संकलनाच्या घंटागाड्या आदी वाहनांचाही वापर करण्यात आला. जेटींग मशीनव्दारे एपीएमसी मार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेषत्वाने भाजीपाला मार्केटमधील  प्लॅटफॉर्मची सफाई करण्यात आली. त्यासाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. अडगळीच्या जागांचीही सफाई करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले.
यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसीचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांच्यासह भाजीपाला मार्केटची अंतर्गत व परिसर पाहणी करुन त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील अशाप्रकारे सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
या मोहीमेमध्ये नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्यासह माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक व सचिव डॉ.पी.एल. खंडागळे, नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, एपीएमसीचे सहसचिव डॉ.महेश साळुंखे पाटील व संचालक अशोक वाळुंज व शंकरशेठ पिंगळे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व विशाल डोळस, नमुंमपा घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व संतोष वारुळे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *