अनिल ठाणेकर
ठाणे : शिवाईनगर येथील रौनक बिल्डरच्या सुमारे २१०० स्के.मीटर सुविधा भुखंडावर ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिले मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विनंतीवरून या मराठा भवनासाठी २५ कोटी रूपयांचे अनुदान महापालिकेला दिले आहे. तसेच स्थानिक नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या निधीतून सुमारे २ कोटी रूपये कुंपनभिंत, लॅण्डस्केपिंग व इमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी देण्यात आले. असा एकूण २७ कोटी रूपयांचा निधी मराठा भवनासाठी खर्च होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये अद्ययावत मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे अशी मागणी सकल मराठा समाज व इतर मराठा संघटनानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. राज्यातील अनेक दुर्गम भागातून मराठा विद्यार्थी व विद्यार्थींनी मुंबई-ठाणे येथे शिक्षणासाठी येत असताना विद्यार्थ्यांना वसतिगृह नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचे तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणार्या गोर-गरीब मराठा समाजाला कौटुंबिक कर्यक्रमासाठी माफक दरात हॉल उपलब्ध होत नसल्याने ही वस्तुस्थिती आमदार प्रताप सरनाईक यांच्या निर्दशनास आले. त्याकरिता शिवाईनगर मधील एक मोक्याचा भुखंड महापालिकेच्या ताब्यात आल्यामुळे त्या भुखंडावर मराठा भवन विकसित करावा व त्यासाठी लागणारा २७ कोटी रूपयांचा खर्च नगरविकास खात्यातून करावा अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मा. मुख्यमंत्र्याकडे केली असता त्यांनी ती मान्य केल्यामुळे ठाण्यातील मराठा भवनाचा मार्ग सुकर झाला आहे. शिवाईनगर मध्ये बांधण्यात येणार्या मराठा भवनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्याकरिता तळमजला व पहिल्या मजल्यावर २ बॅक्वेट हॉलची निर्मिती करण्यात येणार असून ते मराठा समाजातील नागरिकांसाठी नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उर्वरीत मजल्यावर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी १०० मुलांचे व १०० मुलींचे क्षमता असलेले वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये महिला व पुरूषांसाठी चेजींग रूम, कॅन्टीन, लायब्ररी तसेच स्टेअर केस ची सुविधा असणार आहे, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी सांगितले.मराठा भवन उभारण्याच्या कामाला आता सुरूवात झाली असून पुढील दोन वर्षात सदरची इमारत महापालिकेच्या ताब्यात मिळणार असल्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे, असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
