नवी मुंबई :‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये सागर किना-यावरील खारफुटीपासून रेल्वेपर्यंत तसेच लहान मंडईपासून अशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटपर्यंत विविध ठिकाणी व्यापक लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन या मोहीमांमध्ये आबालवृध्द नागरिकांनी उत्साहाने मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला.
‘स्वभाव स्वच्छता, सखोल स्वच्छता’ अभियानांतर्गत नागरी भागाप्रमाणेच एमआयडीसी भागातही अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्री.संतोष वारूळे, परिमंडळ उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.
यामध्ये घणसोली विभागातील रबाले एमआयडीसी येथे भूखंड क्र. आर 267 वरील फूड सायन्स लि. या उद्योग समुहातील अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येत घणसोलीचे सहा.आयुक्त श्री. संजय तायडे व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांच्या नियंत्रणाखाली महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्यासह परिसरात सखोल स्वच्छता केली.कोपरखैरणे विभाग अधिकारी श्री.सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंग चव्हाण यांनीही विभागातील अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता मित्रांसह महापे एमआयडीसी परिसरात तेथील उद्योग समुहातील 350 हून अधिक कामगारांसमवेत स्वच्छता मोहीम राबविली. विशेषत्वाने कॉन्सेट्रो, पेमेंट सिस्टीम आर्किटेक्ट यांच्या कर्मचा-यांसह महापे एमपीसीबी गेट ते हायवे पर्यंत सखोल स्वच्छता करण्यात आली. कोपरखैरणे से 19 येथेही मोहीम राबवून खाडी किना-यालगतचा कचरा गोळा करण्यात आला.अशाचप्रकारे दिघा एमआयडीसी भागातही परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड व स्वच्छता अधिकारी श्री. प्रविण थोरात आणि अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताप्रेमी नागरिक तसेच कंपनीतील कर्मचा-यांनी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. वाशी विभागात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मधील अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या सहयोगातून वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री. सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री सुर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली से 8, सागर विहार परिसरात राबविण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत स्थानिक नागरिकही उत्साहाने सहभाग झाले होते.
नेरुळ विभागाचे सहा.आयुक्त श्री. जसंत जावडेकर यांच्या नियंत्रणाखाली नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात डि.वाय.पाटील कॉलेज मधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांसह सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कोपरखैरणे विभागात बोनकोडे गाव व परिसरात व्यापक जन सहभागातून लोकप्रतिनिधींच्या सहयोगाने मोठया प्रमाणावर स्व्चछता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत नमुंमपा सीबीएससी शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. अशाचप्रकारे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये रिलायन्स स्कुलच्या 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेचा एक भाग म्हणून ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले. ज्ञानविकास हायस्कुल, से 17 कोपरखैरणे व लायन्स क्लब कोपरखैरणे यांच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त कोपरखैरणे परिसरात स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली होती. त्यामध्येही विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
घणसोली विभागामध्ये से 3 येथील सेंट्रल पार्क मधील जॉगींग ट्रॅक व परिसरामध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मीसह सीआयएसएफचे जवान व नागरिक तसेच तसेच उद्यान सहाय्यक श्री. दिपक रोहेकर यांच्यासह उद्यानातील बहुउद्देशीय सेवकही सहभागी झाले होते.
ऐरोली विभागातही सहा.आयुक्त श्री. अंकुश जाधव व उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली से 3 येथील वाणिज्य संकुल व खाऊ गल्ली परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याच्या सांगता दिवशीही म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजीही विविध ठिकाणी स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या व महात्मा गांधीजींच्या स्वच्छता संदेशाचे स्मरण करीत नागरिकांनी त्यामध्ये विशेष सहभाग घेतला.
