डोंबिवली :येथील पूर्व भागातील आयरे जलकुंभा शेजारील साई रेसिडेन्सी या बेकायदा इमारतीवर बुधवारपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या दोन महिन्यापूर्वी ही बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने रहिवाशांच्या मागणीवरून न्यायालयाने या कारवाईला ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती.
उच्च न्यायालयाच्या तोडकामाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका साई रेसिडेन्सीमधील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची मागणी मान्य न करता त्यांची याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांना कोणताही दिलासा न दिल्याने बुधवारपासून ग प्रभागाचे साहाय्य आयुक्त संजयकुमार कुमावत, साहाय्यक अभियंता शिरिषकुमार नाकवे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जव्वाद यांच्या उपस्थितीत.
तोडकाम पथकाने बुधवारी दुपारी साई रेसिडेन्सी तोडण्याची कारवाई सुरू केली. ‘लोकसत्ता’ने या बेकायदा इमारतीचा विषय लावून धरला होता. जेसीबी, पोकलेन, स्लॅब तोडणाऱ्या क्रॅकर सयंत्र तोडकाम यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ही इमारत रहिवाशांनी स्वताहून पालिकेला रिकामी करून दिली.
