नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’मोहीमेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नमुंमपा आरोग्य विभागामार्फत विशेष धुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याकरिता नियमित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जातो. यादृष्टीने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पूर्ण कार्यक्षेत्राचा विचार करुन साप्ताहिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरुन प्रत्येक कार्यक्षेत्रात आठवड्यातून एकदा फवारणी व धुरीकरण करण्यात येईल.
नमुंमपा कार्यक्षेत्रात डास प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याकरिता दि. 5 ते 11 ऑक्टोबर 2024 या एक आठवड्याच्या कालावधीत विशेष धुरीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात एकाच दिवशी रासायनिक धुरीकरण करण्यात येणार आहे.
याकरीता 5 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत एकूण सहा गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये 4 ते 5 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये–दि. 5 ऑक्टोबर रोजी सीबीडी, वाशीगाव, इंदिरानगर, राबाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात, दि. 7 ऑक्टोबर रोजी से-48 नेरूळ, कुकशेत, सानपाडा, खैरणे, दिघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तसेच 8 ऑक्टोबर रोजी करावे, नेरुळ-2, तुर्भे, महापे, ऐरोली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रासायनिक धुरीकरण करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे दि. 9 ऑक्टोबर रोजी शिरवणे, जुहुगाव, कातकरीपाडा, चिंचपाडा तसेच 10 ऑक्टोबर रोजी नेरुळ-1, पावणे, घणसोली, इलठणपाडा आणि दि. 11 ऑक्टोबर रोजी नोसीलनाका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रासायनिक धुरीकरण केले जाईल.
तरी नागरिकांनी सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नमुंमपा आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व धुरीकरणाविषयी काही तक्रारी असल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास संपर्क साधावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत करण्यात येत आहे.
