पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांचे आभार : संजय वाघुले
ठाणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहराध्यक्ष वाघुले यांनी आभार मानले आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. मात्र, ऐतिहासिक व प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच न्याय मिळवून दिला. या निर्णयामुळे मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि जतन करण्यास मोलाची मदत होणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संशोधनाला संधी मिळेल, अशी आशा भाजपाचे शहराध्यक्ष वाघुले यांनी व्यक्त केली.
या निर्णयामुळे मराठी तरुण-तरुणींना शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. देशातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय उपलब्ध होईल. अभिजात भाषातील प्राचीन ग्रंथाचे जतन, दस्तऐवजीकरण व डिजिटायझेशन, भाषांतरामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभरात वेगाने होईल, अशी आशा संजय वाघुले यांनी व्यक्त केली.
मराठीतील लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू यासारखी समृद्ध ग्रंथसंपदेबरोबरच संतांची लेखणी, शाहिरांचे वाङमय आणि लोकसाहित्याची गाथा आता जगात पोचेल. मराठीचा बोलबोला होईल, अशी आशा वाघुले यांनी व्यक्त केली. मराठीतील ज्ञानगंगा असलेल्या राज्यातील १२ हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. सध्या आर्थिक संघर्ष करीत असलेल्या ग्रंथालयांना पुन्हा सुवर्णकाळात पोचण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरेल, असे वाघुले यांनी सांगितले.
0000
