महायुती शिवाय पर्याय नाही – खासदार श्रीकांत शिंदे
डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेल्यास महायुतीचे उमेदवार चव्हाण यांच्या विरोधात ते लढत देऊ शकतात. दीपेश यांच्या प्रवेशाच्या पूर्वसंध्येला मंत्री चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे हे एकत्र आल्याचे दिसुन आले. यावेळी महायुती शिवाय पर्याय नाही. मंत्री चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुका समोर ठेवून मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे यांची गट्टी जमल्याचे बोलले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी घेत तिकिटासाठी जोर लावण्यास सुरवात केली आहे. निवडणूका व इतर गणिते मांडत या पक्षातून त्या पक्षात उड्या देखील सुरू झाल्या आहेत. डोंबिवली मधील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याची कुणकुण पक्षातील वरिष्ठांना आधीच लागली होती. पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत भाजपचे मंत्री चव्हाण आणि सेनेचे खासदार डॉ. शिंदे एकत्र आले. महायुती मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना हे वातावरण शांत करण्यासाठी दोघे एकत्र आल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता-पुत्र यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांचे काम करायचे नाही असा निर्णय घेत असहकार पुकारला होता. त्यास मंत्री चव्हाण यांचा देखील पाठिंबा होता. मात्र नंतर महायुती झाल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी महायुतीची निष्ठा राखत, भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करून श्रीकांत यांच्यासाठी काम करण्याचे आवाहन केले होते. शिंदे यांचा विजय झाला असला तरी त्यांना फारसे मताधिक्य घेता आले नव्हते.
याची पुनरावृत्ती आता विधानसभेत होणार का ? शिंदे गट विधानसभेला चव्हाण यांना मदत करणार की शांत राहण्याची भूमिका घेतात याची चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे शिंदेचे पदाधिकारी म्हात्रे हे चव्हाण यांच्या विरोधात विकासाच्या मुद्द्यावर ताशेरे ओढत होते. त्यात ते ठाकरे गटात जाणार असल्याने महायुती उमेदवार चव्हाण यांना आव्हान उभे राहू शकते.
