सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांचे भूमिपूजन

कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला आहे. सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.

दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था असते. आधी रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच पहिल्या टप्प्यात भगवा तलाव येथील आदेश्र्वर चौक ते विकास हाईट्स (४.९५ कोटी), सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता (४.९० कोटी) आणि उंबर्डे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता (४.५० कोटी) अशा १४ कोटी ३५ लाखांच्या निधीतील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले, तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसांत भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली.

भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक श्रेयस समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, शहर अधिकारी सुजित रोकडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *