ठाणे : सणासुदीच्या काळात अतिउत्साहात नागरिक कायद्याचे उल्लंघन करतात; मात्र कायद्याचे उलंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. नवरात्रोत्सवात लाऊडस्पीकर, डीजेच्या आवाजावर निर्बंध ठेवणे गरजेचे आहे. अतिउत्साहात मंडळाने ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.

ठाणे संस्कृतीचे शहर आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विविध सण जल्लोषात साजरे करण्यात येतात. तसेच, मिरवणुकीच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) वापर करण्याला परवानगी असल्याने मंडळे विविध प्रकारच्या अत्याधुनिक साधनसामग्रीच्या ध्वनिक्षेपकाचा, डॉल्बी, डीजेचा वापर करतात. ज्यात ध्वनीचे प्रमाण जास्त असल्याने सामान्यजनतेच्या आरोग्य व मानसिक स्वास्थावर विपरीत परिणाम होतो. सण–उत्सव सर्व नागरिकांना उत्साहात साजरे करता यावेत, या निखळ भावनेने आयुक्तांनी ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत जनतेला जाहीर आवाहन केले आहे. उत्सव साजरा करताना कायद्याचे उल्लंघन करण्यात येऊ नये, अन्यथा ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाखाचा दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, रात्री दहा ते पहाटे सहापर्यंतच्या कालावधीत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. तर, ठरावीक ठिकाणी ध्वनिक्षेपकाला परवानगी रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *