मुंबई : सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतर शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने पटकाविले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक फटक्यांची आतषबाजी करीत वेदांत राणेने प्रारंभी ७-० अशी मोठी आघाडी घेणाऱ्या आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेचे आव्हान १२-११ असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. परिणामी नील म्हात्रेला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते अनिल घाटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
तत्पूर्वी दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड-भायखळा येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेदांत राणेने सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरीच्या स्वस्तिक सुर्वेचा २५-२ असा तर नील म्हात्रेने ससून जेकब हायस्कूल-नागपाडाच्या मयांक सोळंकीचा २५-० असा पराभव केला. स्पर्धेमधील उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, बाबासाहेब आंबेडकर एमपीएस-वरळीचा समीर खान, डॉ. शिरोडकर हायस्कूल-परेलचा वेदांत हळदणकर, ह्यूम हायस्कूल- नागपाडाचा आयुष पालकर यांनी जिंकला. याप्रसंगी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन यांच्यातर्फे यंदा क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार पात्र ठरलेले नामवंत कबड्डीपटू व प्रशिक्षक अनिल घाटे यांचा शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा संघटक निवृत्ती देसाई, कॅरम पंच चंद्रकांत करंगुटकर, मंडळाचे पदाधिकारी कृष्णा रेणोसे, भूषण परुळेकर, अनिल शेलार, अशोक मुलकी, गौतम कांबळे, प्रमोद पाताडे आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *