मुंबई : कलम ३७० हटवल्यानंत पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारली आहे. २०१४ मध्ये अवघ्या १५ जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सनं यावेळी तब्बल ४२ जागांपर्यंत मजल मारली आहे. तर त्यांची सहकारी असणाऱ्या काँग्रेसने ७ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने ४९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जम्मू -काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत येणार हे निश्चित झालंय.
काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा जवळपास निम्म्यानं घटल्यात. गेल्यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचा सुपडासाफ झाला. तर भाजपला चार जागांचा फायदा झाला असून त्यांनी २९ जागा जिंकल्या आहे.. पण भाजपनं जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात भाजपला खातंही खोलता आलं नाही. विशेष म्हणजे भाजपचे जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.