भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या वर्ग एक ते चारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे मनधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी एवढेच सानुग्रह अनुदान यावर्षीही देण्यात येणार आहे. त्यापोटी होणाऱ्या सुमारे साडेचार कोटींच्या खर्चाला आयुक्त संजय काटकर यांनी मान्यता दिली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्याची तरतूद नसल्याने दरवर्षी सानुग्रह अनुदान मंजूर केले जाते. हे सानुग्रह अनुदान किती असावे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य महापालिकेला देण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पात सानुग्रह अनुदानासाठी पाच कोटी ९५ लाखांची तरतूद ठेवण्यात आली आहे. यावर्षी सानुग्रह अनुदानाच्या रकमेत वाढ न करता ते गेल्या वर्षी एवढेच देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार वर्ग एक ते वर्ग चार या संवर्गातील १,४१० कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे महापालिका शाळेतील शिक्षकांना प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे संगणक चालक, बालवाडी शिक्षिका, लिंक वर्कर, वैद्यकीय आरोग्य विभागातील ठोक मानधनावरील कर्मचारी, त्याचप्रमाणे अन्य विभागातील मनधनावरील कर्मचारी यांनाही सानुग्रह अनुदान देण्यात येणार अहे. त्यासाठी सुमारे चार कोटी ४६ लाख ९२ हजार ९९९ रुपयांचा खर्च येणार आहे. हे सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे.
