मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती आंतर शालेय-कॉलेज मुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल-पुण्याच्या तनया पाटीलने अजिंक्यपद पटकाविले. प्रतिकूल स्थितीत प्रारंभी आघाडी घेत अचूक फटाक्यांच्या जोरावर तनया पाटीलने आर.बी.शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा कदमचे आव्हान ११-१ असे संपुष्टात आणले आणि तनयाने विजेतेपदाला गवसणी घातली. परिणामी स्वरा कदमला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला क्रीडा प्रमुख सुनिता चव्हाण, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.

 

परेल येथील आरएमएमएस सभागृहात राष्ट्रीय दर्जाच्या सबज्युनियर कॅरमपटूसह मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आदी जिल्ह्यातील ६० मुलींच्या सहभागाने झालेली उपांत्य फेरीची लढत कमालीच्या अटीतटीमध्ये रंगली. पाटकर विद्यालय-डोंबिवलीची आर्या घाणेकर विरुध्द स्वरा कदम यामधील सामना संपूर्ण डावामध्ये ११-११ अशा बरोबरीने संपला. त्यामुळे अलाहिदा बोर्डमध्ये झालेल्या सामन्यात स्वरा कदमने १६-११ अशी बाजी मारली. सुरुवातीपासून विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याच्या तनया पाटीलने रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेचा ५-४ असा निसटता पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार पाटकर विद्यालय-डोंबिवलीची सारा देवन, आस्पी नूतन अकॅडमी-मालाडची धर्मी शुक्ला, जांभेकर हायस्कूल-रत्नागिरीची सेजल जाधव, विश्वनाथ विद्यालय-राजापूरची निधी सप्रे यांनी जिंकला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत मुलींसाठी विविध उपक्रम साकारणाऱ्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांचा षष्ठब्दीपुर्तीनिमित्त शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह व सुवर्णमुद्रा देऊन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *