ठाणे : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, ठाणे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास बि. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे आणि प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा सदन, जिल्हा न्यायालय, ठाणे येथे दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी “जागतिक मानसिक आरोग्य दिन” अंतर्गत न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ यांच्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी म्हणाले की, व्यक्त होणे फार गरजेचे आहे अन्यथा त्याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होवू शकतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या मानसिक स्वास्थ्याबाबत संवेदनशील असले पाहिजे व कामाच्या ठिकाणी आपल्या मानसिक आरोग्यास प्राधान्य दिले पाहिजे.

मनोविकार नव्हे तर मनोविकास असे म्हणा, असे सांगत प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वर्ग 1 चे मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल भुसारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणाला सुरुवात केली. कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्यास प्राधान्य देणे हा विषय घेवून या शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. भावना, विचार व वर्तन या गोष्टी मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. कामाच्या ठिकाणी मानसिक तणावातून दूर राहण्यासाठी कामाचे महत्वाची कामे व तात्काळ करावयाची कामे असे वर्गीकरण करून त्यानुसार कामाला प्राधान्य यावे, जेणेकरून कामावा ताण स्वास्थ्यावर होणार नाही. तसेच मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी झोप, जेवण आणि व्यायाम या गोष्टीचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे, असे सांगून त्याबाबतीतील उदाहरणे देवून विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर मानसिक तणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी योगनिद्रा व ध्यानधारणा याचे प्रात्यक्षिक उपस्थितांसोबत मनोरूग्ण तज्ञ परिचारक देवेंद्र शिंदे यांनी करून घेतले.

कार्यकमाची सांगता करताना मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे श्री.एस.के.फोकमारे म्हणाले की, भुतकाळातल्या गोष्टी आठवून आपण त्याचा ताण घेवून आपल्या वर्तमानावर त्याचा विपरीत परिणाम करून घेत असतो. तसे न करता भुतकाळातल्या चुका सुधारून वर्तमानात स्वच्छंदपणे जगण्याचे उपस्थितांना आवाहन केले व कार्यक्रमाच्या आयोजकांचे व मान्यवर व्याख्याते मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल भुसारे, समाजसेवा अधिक्षक ब्रम्हदेव जाधव व त्यांच्या कर्मचारी वृंदाचे आभार मानून शिबिर संपन्न झाल्याचे जाहीर केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *