राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच निवडणूक खर्च करण्याचे केले आवाहन

ठाणे : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच निवडणूक खर्च करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, एमसीएमसी  कमिटी सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी (माध्यम कक्ष) मनोज शिवाजी सानप, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे, दिलीप सूर्यवंशी, वैजनाथ बुरुडकर, आचारसंहिता कक्ष सहायक नोडल अधिकारी सुकेशिनी पगारे, तहसिलदार सायली भगत, प्रदीप कुडाळ आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले, भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे. त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषत: नामनिर्देशनपत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1950

लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष 24 तास सुरु आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या विविध ॲप्सच्या सुविधांचा लाभ घ्यावा तसेच नागरिकांनाही या ॲप्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले.

यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आचारसंहितेत काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासह आचारसंहिता कक्ष सहायक नोडल अधिकारी सुकेशिनी पगारे उपस्थित होत्या.

यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी (माध्यम कक्ष) मनोज शिवाजी सानप यांनी माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीअंतर्गत होणाऱ्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक संबंधीच्या खर्चाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सत्यवान उबाळे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासह या बैठकीस, ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *