काहींची पदोन्नती झाल्याने त्यांची दिवाळी गोड

उल्हासनगर – सामान्य प्रशासनाच्या अहवालानुसार आयुक्त विकास ढाकणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत 54 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तर काहींची पदोन्नती करण्यात आल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे.

महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात कार्यरत होते. एकाच पदावर अनेक वर्षे काम करीत असल्याने त्यांच्या मनमानी कारभाराबाबत सतत वाढत्या तक्रारी लक्षात ठेवून मनपा आयुक्त विकास ढाकणे यांनी मंगळवारी जवळपास 54 कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात उचलबांगडी केल्याने प्रथमच पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यामध्ये कनिष्ठ लेखा परीक्षक, वरिष्ठ लिपिक, कर निरीक्षक, कनिष्ठ लिपिक, जकात निरीक्षक, शिपाई, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मजूर यांचा समावेश आहे. आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. विजय खेडकर आणि सहायक आयुक्त सुनिल लोंढे यांनी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली आहे.

‘बंपर पदोन्नतीने प्रशासकीय व तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड’

 

एकीकडे एकाच विभागात वर्षोनुवर्षे कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असताना दुसरीकडे आयुक्त विकास ढाकणे यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे महानगरपालिकेत प्रथमच प्रशासकीय सेवेत सहाय्यक आयुक्त या पदावर तीन जणांची वर्णी लागली आहे.

 

अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. विजय खेडकर व सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांनी सामान्य प्रशासन विभागाची अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान केलेली असून पहिल्या टप्प्यात 3 सहाय्यक आयुक्त, 2 अधीक्षक,12 वरिष्ठ लिपिक, 6 वीजतंत्री व 17 तारतंत्री या पदांवर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करून त्यांची येणारी दिवाळी गोड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *