मनोहर शेठ भोईर यांना अटकेनंतर जामीन मंजूर

 – सेझ आंदोलन प्रकरणात माजी आमदारांसह ७ जण होते अटकेत

राज भंडारी

पनवेल : महामुंबई सेझविरोधात अखंड शिवसेनेने बेलापूर येथील कोकण भवन व सिडको कार्यालयात केलेल्या आंदोलनातील गुन्ह्याप्रकरणी उरणचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्यासह ७ कार्यकर्त्यांना बुधवारी रात्री अटक करून तळोजा कारागृहात नेण्यात आले होते. याबाबत बातमी सर्वदूर पसरल्यानंतर कार्यकर्त्यांची मनोहर भोईर यांना सोडविण्यासाठी धावाधाव सुरू झाली. माजी आमदार मनोहर भोईर यांचे वकील ॲड.योगेश गांगल, ॲड. रत्नदीप पाटील आणि ॲड. धनश्री भोईर यांनी बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज मंजूर केला. न्यायालयाच्या या सुखद कृतीमुळे पनवेल उरण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला. यावेळी विरोधकांच्या गुदगुल्या फार काळ टिकल्या नाहीत असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटताना दिसला.

उरण, पनवेल व पेण तालुक्यातील ४५ गावातील ३० हजार एकर जमिनीवर महामुंबई सेझ प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह शिवसेनेचाही विरोध होता. त्यामुळे सेझ हटाव या मागणीसाठी सरकार विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. या संदर्भात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर बेलापूर न्यायालयात १७ वर्षे सुनावणी सुरू होती. मात्र अचानक वॉरण्ट निघाले आणि माजी आमदारांसह ७ जणांना अटक करून तळोजा कारागृहात पाठविण्यात आले.

त्यानंतर तात्काळ माजी आमदार मनोहर भोईर यांच्या कायदेशीर कमगाज पाहणाऱ्या टीमने न्यायालयात धाव घेत गुरुवारी जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयामार्फत जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला  याप्रकरणी मनोहर भोईर यांचे वकील ॲड. योगेश गांगण, ॲड. रत्नदीप पाटील, ॲड. धनश्री भोईर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी आपला नेता जेलबाहेर आल्याच्या वृत्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला तर १९० उरण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक मनोहर भोईर यांना राजकीय ताकद वापरून त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत विरोधकांच्या गुदगुल्या फार काळ टिकल्या नाहीत असा सूर न्यायालयाच्या बाहेर ऐकायला मिळाला.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *