ठाणे, दि.17(जिमाका):- विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी 135-शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार वाढविण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे व पथक प्रमुख, मतदार जनजागृती तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर राजेंद्रकुमार हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यामार्फत मतदार जनजागृती केली असून मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले.
16 ऑक्टोबर रोजी शहापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, पेंढरघोळ येथे मतदार जनजागृती (स्वीप) कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून विविध स्पर्धा, जनजागृती प्रभात फेरी (रॅली), पथनाटय कार्यक्रम तसेच साक्षरता मंच, आश्रमशाळेच्या शेजारील वाड्या, पाड्यातील लोकांना एकत्रित करुन मतदार देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी यावेळी सर्व उपस्थित नागरिकांना केले.
00000
