‘इंडिगो’चे हिवाळी वेळापत्रक जाहीर;
२- २७ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

 

हरिभाऊ लाखे
नाशिक : इंडिगो कंपनीने नाशिक विमानसेवेचे हिवाळी सत्रातील वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार नाशिकच्या विमानांच्या वेळांत काही बदल करण्यात आले आहेत. काही शहरांतून नवी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीही उपलब्ध होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक विमानतळावरील इंदूर, गोवा, नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यांपैकी काही शहरांच्या विमानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. बेंगळुरूसाठी एक तास आधी, तर हैदराबादसाठी दोन तास आधी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंदूरची वेळ तीन तास उशिरा, तर अहमदाबाद विमानाची वेळ दुपारऐवजी सायंकाळची करण्यात आली आहे. नवी दिल्ली विमानाच्या वेळेत मात्र कोणताही बदल नाही. दि. २७ ऑक्टोबरपासून नाशिक येथून जयपूरसाठी (व्हाया इंदूर) विमानसेवाही सुरू होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार नाशिकला अबूधाबी, बँकॉक, कोलम्बो, शिकागो, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, मॉरिशस, वॉशिंग्टन यांसारख्या ४२ देशांतील शहरांना दररोज आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
वेळांतील बदल
नाशिक- गोवा : दुपारी १२.०५ ऐवजी १२ वाजता उड्डाण, १.५० ऐवजी १.४० ला लॅण्डिंग
नाशिक-अहमदाबाद : सकाळी १०.४५ ऐवजी सायंकाळी ५.४५ ला उड्डाण, दुपारी १२.१० ऐवजी सायंकाळी ६.५५ ला लॅण्डिंग
नाशिक नागपूर : सायंकाळी ४.२० ऐवजी ४.३५ ला उड्डाण, सायंकाळी ६.१० ऐवजी ६.०५ ला लॅण्डिंग
नाशिक-हैदराबाद : दुपारी २.२५ ऐवजी १२.३० ला उड्डाण, सायंकाळी ४.२० ऐवजी दुपारी २.१० ला लॅण्डिंग
नाशिक-बेंगळुरू : सायंकाळी ४.५० ऐवजी ३.४० ला उड्डाण, सायंकाळी ६.३५ ऐवजी ५.३० ला लॅण्डिंग
नाशिक-इंदूर : दुपारी ११.०५ ऐवजी २.४० ला उड्डाण, १२.२० ऐवजी ३.५० ला लॅण्डिंग
गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर लॅण्डिंग
गोव्यात आता उत्तर गोवा विमानतळाऐवजी दाबोलिम विमानतळावर नाशिक विमानाचे लॅण्डिंग होणार आहे. या विमानतळावर सेवा शुल्क कमी असल्याने प्रवाशांच्या विमानभाड्यात काहीशी कपात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *