ठाणे,दि.19(जिमाका):- विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढावी किंबहुना नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्याच्या दृष्टीने 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघतील शाळा क्र. 38 येथे महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. स्वीपच्या माध्यमातून शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या महिला मेळावा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देत उपस्थितांमध्ये जनजागृती केली. लोकसभा निवडणुकीप्रमाणे नागरिकांनी येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणूकीतही आपला मतदानाचा हक्क बजावावा. त्याचप्रमाणे आपल्या घरातील, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, मित्रपरिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे मार्गदर्शन स्वीपचे राजेंद्र परदेशी यांनी यावेळी केली. लोकशाहीने दिलेला अधिकार मी बजावणारच अशी शपथ या कार्यक्रमादरम्यान देण्यात आली. पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला.
यावेळी नोडल अधिकारी कमलाकांत म्हेत्रे, अनंत परदेशी, अनंत सोनावळे, अविनाश सावंत, सिताराम परब आदी स्वीप सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन शाळा क्र. 38 च्या मुख्याध्यापिका आशा पाटे, मनोज सिंग यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी केले होते.
00000
