राजन चव्हाण

रत्नागिरी : कोकणात शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून त्यात आज सावंतवाडी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपकरांची भर पडली. कोकणातील फायरब्रँड नेता अशी ओळख असणारे परशुराम उपरकर यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. उपरकर यांनी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला आहे.

दोनच दिवसापुर्वी राजन तेली यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. राजन तेली, परशुराम उपकर आणि गेल्यावर्षी ठाकरे सेनेत दाखल झालेल्या संजय कदम या त्रिकुटामुळे ठाकरे सेना आगामी विधानसभेत ठक्कर देण्यास सज्ज झाली आहे. त्यात भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांची मातश्रीशी जवळीक वाढल्याने एकनाथ शिंदे गटाच्या उदय सामंताची अडचणीत वाढ होऊ शकते.

उपरकर यांना शिवसेनेने विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. दरम्यानच्या काळात ते राज ठाकरे यांच्या मनसेत सक्रिय होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनसे चा राजीनामा दिला होता.

उपरकर यांनी शिवबंधन बांधले तेव्हा यावेळी शिवसेना नेते आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उपरकर यांनी केलेला पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, अप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, विनोद सांडव, नाना सावंत आबा चिपकर, शैलेश मयेकर, मंदार नाईक, अभय देसाई, प्रकाश साटेलकर, सुरेंद्र कोठावळे, मनोज कांबळी, यांनीही ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *