मुंबई: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यावर २४ तासाच्या आतच या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. महत्त्वाचे म्हणजे पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची लगेच जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आली होती. या पक्षप्रवेशानंतर समाजमाध्यमात चहुबाजूने टीकेची झोड उठल्यावर सायंकाळी उशीरा हा प्रवेश स्थगित करण्यात आल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले.
वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटीने अमोल काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं होतं. श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता, हे एसआयटीच्या तपासात पुढे आलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. पण ४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर केला. त्यामुळे तो आता जामिनावर होता.
जालन्यातील श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक असला तरी त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे. साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी जालन्यात शिवसेनेचा जोमात होती. त्यावेळी जगन्नाथ पांगारकर यांचा मुलगा श्रीकांतने शिवसेनेत प्रवेश केला. जालन्यात पांगारकर यांचे स्वस्त दरात धान्य व रॉकेलचा व्यवसाय होता. २००१ ते २०१० अशी सलग १० वर्षे तो शिवसेनेचा नगरसेवक होता. २०११ मध्ये त्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर श्रीकांत पांगारकर हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम करु लागला. तो केदारनाथमधील जलप्रलयानंतर तिथे मदतकार्यासाठीदेखील गेला होता.
