माथेरान : माथेरान मध्ये चिक्की चपला प्रसिद्ध आहेत पण त्याचबरोबर इथले खास आकर्षण म्हणजे इथली माकडे आहेत. माथेरान मध्ये कुठेही गेल्यास माकडांच्या टोळ्या गटागटाने दिसतात.प्रत्येक पॉईंट्स वर ही माकडे आपल्या समुदायाने जंगलात वास्तव्य करून राहतात. तर गावात सुध्दा यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुख्य प्रवेशद्वार दस्तुरी पासून ते वन ट्री हिल पॉईंट या शेवटच्या टोकापर्यंत जिकडे तिकडे माकडे दिसतात. मागील काही वर्षांपासून हॉटेलमधील किचन वेस्ट नगरपरिषदेच्या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरले जात असल्याने त्यांच्या खाण्याची गैरसोय झाली आहे. त्यामुळे ही माकडे भररस्त्यात पर्यटकांच्या हातातील खाद्य पदार्थ किंवा शीतपेय बाटली हिसकावून काही सेकंदात फस्त करतात. शक्यतो ही माकडे कुणाला सहसा इजा करत नाहीत परंतु त्यांना दगड मारल्यास खूपच संतापुन अंगावर गुरगुरतात.पावसाळ्यात तर गावातील नागरिकांच्या घरामध्ये शिरून जो काही खाद्यपदार्थ हाताला मिळेल ते घेऊन पळ काढतात. माथेरानचे हे एकमेव आकर्षण असून खाण्याची आबाळ झाल्यामुळे केवळ भुकेपोटी पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून घेतात.
