मुंबई : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार जिंतेंद्र आव्हाडांविरुद्धचा महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे. उमेदवार नजीब मुल्ला यांनी अजित पवारांकडून पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारला. त्यामुळे, ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी ही एक लक्षवेधी लढत होणार आहे.
नजीब मुल्ला २८ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर नजीब मुल्ला यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड २४ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे, या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवारांनी मुस्लीम उमेदवार देऊन मोठी राजकीय खेळी केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना हे आव्हान ठरणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
