पर्यावरण

मिलद बेंडाळे

हवामानबदलाची समस्या अधिक गंभीर होत आहे. 20 वर्षांपूर्वी पर्यावरण शिक्षण हा अनिवार्य आणि स्वतंत्र विषय बनवला असता, तर आज एक तरुण पिढी देशाच्या प्रशासनात कार्यरत असती. त्यांच्या मनात पर्यावरण रक्षणाविषयीची आदरभावना निर्माण झाली असती. त्यांच्यापैकी कोणी तरी दिल्लीची समस्या एक आव्हान मानून सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असते आणि ते यशस्वी झाले असते.

सुप्रसिद्ध बौद्ध विचारवंत थिच नट हान यांनी हवामानबदलाच्या गंभीर समस्येबाबत म्हटले होते की, आपण सध्या चालत असलेल्या मार्गावरच चालत राहिलो, तर आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर मानवजातीचा विनाश होईल. हवामानबदलाची परिस्थिती समजली असलेले आणि वस्तुस्थिती माहीत असलेले याच्याशी असहमत होऊ शकत नाहीत. जगभर सत्तेत असलेले लोक सध्याचा मार्ग बदलण्याविषयी सतत बोलतात आणि अनेक उपायांवर चर्चा करतात; पण प्रत्यक्षात कोणताही बदल घडत नाही, तेव्हा आश्चर्य वाटते. याचे सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे दिल्लीतील वायू प्रदूषणाची भीषण समस्या. दर वर्षी तीच आश्वासने, न्यायालयाचे तेच तेच नाराज निर्णय हे दिल्लीचे नशीब बनले आहे. तसे, ही समस्या फक्त दिल्लीची नाही, ती देशभरात आहे, जगभरात आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी भारताची नवी पिढी पर्यावरण प्रदूषणाला सामोरे जाण्यासाठी तयार होण्याची शक्यता निर्माण झाली होती; पण ती राजकारणाची बळी ठरली.
खरे तर, सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2003 मध्ये ‌‘एनसीईआरटी‌’ ला पर्यावरण शिक्षण हा वेगळा विषय म्हणून शिकवण्यासाठी पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश दिले होते. या संस्थेने मार्च 2004 मध्ये अभ्यासक्रम तयार करून न्यायालयासमोर ठेवला. न्यायालयाने तो सर्व राज्य सरकारांना पाठवला. सर्व राज्य सरकारांनी तो स्वीकारला. राष्ट्रीय पातळीवर ही अत्यंत समाधानाची बाब होती. आपल्या शालेय शिक्षणाच्या रचनेत आवश्यक ते बदल करून पर्यावरण शिक्षण हा स्वतंत्र विषय बनवण्याबाबतही त्यांनी सांगितले. मे 2004 मध्ये केंद्रात नवीन सरकार आले. हा निर्णय मागील सरकारने केलेल्या प्रयत्नांचे फलित असल्याने अंमलबजावणी झाली नाही. धोरण-निर्धारणाच्या पातळीवर दृष्टीचा अभाव असतो, तेव्हा असे अनेक निर्णय घेतले जातात, ज्यांचा आधार शैक्षणिक नसून राजकीय विचारधारांच्या सततच्या संघर्षात कुठे तरी दडलेला असतो. 20 वर्षांपूर्वी पर्यावरण शिक्षण हा अनिवार्य आणि स्वतंत्र विषय बनवला असता, तर आज एक तरुण पिढी देशाच्या प्रशासनात कार्यरत असती. तिच्या मनात पर्यावरणरक्षणाविषयीची आदरभावना निर्माण झाली असती. त्यांच्यापैकी कोणी तरी दिल्लीची समस्या हे एक आव्हान मानून सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असते आणि ते यशस्वी झाले असते अशी शक्यता आहे.
इंदूर आणि सुरतसारख्या शहरांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत मिळालेले यश आणि देशभरात ज्याचे कौतुक झाले, त्यामागे कुठे तरी एक उत्साही, अभ्यासू आणि दूरगामी व्यक्तिमत्त्व होते. जबाबदार व्यक्तीला प्रामाणिकपणे एखादी समस्या सोडवायची असेल, तर ती मार्ग शोधून त्यावर तोडगा काढू शकते, हे आता सर्वसामान्यांना समजले आहे. त्यासाठी पहिली गरज ही आहे, की त्यांनी कुटुंब आणि करिअरऐवजी लोकसेवा हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून पुढे जावे. लोकशाही म्हणते की जे लोकप्रतिनिधी घटनात्मक पदांवर नियुक्त केले जातील ते लोकसेवेमुळेच तेथे पोहोचतील आणि त्यानंतर सर्व काही या सेवेला समर्पित करतील. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपलानी यासारख्या ऋषीमुनींना स्वतंत्र भारतात नेतृत्व प्रदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून हीच अपेक्षा होती. दुर्दैवाने, सध्याच्या राजकीय आणि पक्षीय वैचारिक बांधिलकींच्या अर्धवट समजुतीमुळे त्यांच्या आकांक्षा पूर्णपणे नाकारल्या गेल्या आहेत. सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेणाऱ्यांचा स्वार्थीपणा व्यक्तीसाठी वेदनादायक परिस्थिती निर्माण करतो. त्यामुळे जनहिताचे मोठे प्रकल्प आपले उद्दिष्ट साध्य करू शकत नाहीत. देशातील सुशिक्षित वर्ग आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढे येईल आणि सरकारी यंत्रणा प्रामाणिक असेल, तेव्हाच सर्वसामान्यांच्या जीवनात अपेक्षित बदल घडतील हे स्पष्ट आहे.
मानवी क्रियाकलापांमुळे पृथ्वी अनेक प्रकारच्या वादळांना तोंड देत आहे. अव्यवस्थित विकास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अंदाधुंद शोषणामुळे पृथ्वीवरील संकट अधिक गडद होत आहे. यामुळेच रोज कोणत्या ना कोणत्या भागात नैसर्गिक आपत्ती येतच असतात. मध्यंतरी अवकाळी पावसाने दुबई शहर हादरले. 16 एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पावसाने तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हा तिथे एकाच दिवसात 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. एवढा पाऊस दुबईत दोन वर्षांमध्ये पडतो! निसर्गाच्या प्रहारामुळे दुबईचे सारे ग्लॅमर निस्तेज झाले. दुबईमध्ये पावसाने कहर केल्यानंतर तीन दिवसांनी पाकिस्तानला निसर्गाचा फटका बसला. मुसळधार पावसामुळे 80 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला तर शेकडो घरांचे नुकसान झाले. हिमाचल प्रदेशमध्येही एप्रिल महिन्यात बर्फवृष्टी झाली. ती ही अशा वेळी झाली जेव्हा देशाच्या अनेक भागांमध्ये अवेळी उष्ण वारे वाहत होते. हैदराबादमध्येही अशाच प्रकारे जोरदार अनपेक्षित पाऊस झाला. अशा घटना आता जगभर अधिक प्रमाणात पहायला मिळत आहेत. निसर्गाचे असे वागणे हा चिंतेचा विषय असतानाच असे का घडत आहे याचा विचार करायला हवा. या सर्व घटनांच्या मुळाशी हवामानबदल असल्याची वस्तुस्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही.
हवामानबदलाचे दुष्परिणाम वर्षभर नवनवीन स्वरूपात दिसून येत आहेत. निसर्गाच्या प्रतिकूल मानवी क्रियाकलापांमुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे, हे सर्वज्ञात आहे. महासागर असो, पर्वत असो, नद्या असो की शेतजमिनी; निसर्ग सर्वत्र हाहाकार माजवत असतो. अनेक देशांमध्ये डोंगराळ भागातील जलाशय कोरडे पडत आहेत आणि वनक्षेत्र कमी होत आहे. या कारणास्तव वन्य प्राणी दररोज तहान शमवण्यासाठी बाहेर पडतात, तेव्हा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. जंगलातील ओलावा कमी होत असल्याने आणि कमालीचे तापमान यामुळे जंगलांना आग लागण्याच्या घटनाही वाढत आहेत. पावसाळ्यात नद्या कोरड्या पडत असून मोठ्या नद्यांमधील पाण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. लागवडीच्या जमिनीतील कार्बनचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. याचा परिणाम अन्न उत्पादनावरही होत आहे. एकाच देशाचे वेगवेगळे भाग दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त आहेत. हवामानबदलाची समस्या वाढवणाऱ्या कारणांमध्ये वाढती लोकसंख्या आणि त्याचा उपभोगवाद यांचाही समावेश आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अधिकाधिक उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे निसर्गाच्या संसाधनांचा अतिशोषण केला जात आहे. उपभोक्तावादामुळे कार्बन डायऑक्साइड, क्लोरो फ्लोरो कार्बन आणि मिथेन यांसारखे हरितगृह वायू वातावरणात मोठ्या प्रमाणात पोहोचत आहेत. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीपासून दैनंदिन गरजांपर्यंत पाण्याचा वापर सातत्याने वाढत असून, त्या प्रमाणात त्याचे संवर्धन होत नाही.
आज अनेक देशांमध्ये कचऱ्याचे डोंगर तयार होत आहेत. जगात दर वर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, जो 2050 पर्यंत अनेक पटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा निर्माण होतो. तो गेल्या पाच वर्षांमध्ये दुप्पट झाला आहे. यातील 90 टक्के कचरा, नद्या आणि नाल्यांमध्ये जातो. प्लास्टिक कचऱ्यामुळे पृथ्वीवरील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे. या कचऱ्याचे छोटे कण पाण्यात हळूहळू विरघळतात. त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्लॅस्टिक कचरा ही पृथ्वीसाठी मोठी समस्या बनली आहे; परंतु त्याचा वापर कमी करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. महासागर प्लास्टिकच्या कचऱ्याने भरलेले आहेत. ते इतर मार्गांनीही पृथ्वीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. पृथ्वीवरील संपूर्ण जैवविविधता धोक्यात आली आहे. आता जागरूक होण्याची, सुधारण्याची आणि उपभोगवादाला आळा घालण्याची वेळ आली आहे. आताही जर आपण सतर्क राहिलो नाही, तर संकट इतके गंभीर होऊ शकते, की त्याला सामोरे जाणे कठीण होऊ शकते. आधुनिक जीवनशैलीत बदल घडवून आणल्याशिवाय काहीही होणार नाही, हे सरकारांबरोबरच समाजानेही समजून घेतले पाहिजे. आपल्याला भौतिक जीवनाचा त्याग करावा लागेल. अन्नपदार्थांची होणारी नासाडी थांबवून वीज आणि पाण्याचा आर्थिक वापर करायला शिकावे लागेल. ‌‘वापरा आणि फेका‌’ची संस्कृती सोडली पाहिजे. हवामान बदल थांबवण्याची जबाबदारी पर्यावरण संस्था आणि सरकार यांची आहे, असा विचार करणे योग्य नाही.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *