राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे; परंतु राजकारणात आम्ही पक्षीय राजकारण करीत नसल्याचे संघ सांगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत केली. कधी कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत केली नाही, हे ही खरे आहे. अनेकदा संघाने इंदिरा गांधी यांना मदत केली. इंदिरा गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात कडवटपणा आला नाही; परंतु राहुल गांधी सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अनेकदा राहुल यांनी टीका केल्यानंतर त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयात अनेक प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. त्यातून अनेकदा संघाच्या स्वयंसेवकांनी राहुल यांच्याविरोधात संघर्ष केला आहे. या पार्श्वभूमीवर मथुरा येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत राहुल गांधींचा विशेष उल्लेख करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्याच्या प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरला आहे. मध्यंतरीच्या काळात संघ आणि भाजपत अविश्वासाची दरी निर्माण झाली होती. अनेक बैठकानंतर ही दरी दूर झाली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या नियोजनानुसार, भारतीय जनता पक्षाने प्रचाराची आखणी केली. असे असताना संघाने राहुल गांधी यांना चर्चेचे निमंत्रण देणे हा त्यांच्याभोवती टाकलेला फास आहे. राहुल गांधी यांनी चर्चेचे निमंत्रण स्वीकारले नाही, तर त्यातून त्यांच्यावर टीका करता येते. सध्याच्या परिस्थितीत राहुल संघाचे निमंत्रण स्वीकारण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. राहुल सातत्याने टीका करीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या निमंत्रणाची चर्चा होणे स्वाभावीक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक घटक संस्थांनी यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या धोरणांवरही टीका केली होती. सरकारला मदत न करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राजकारणात संघाला दुखावण्याची भूमिका भाजपचे शीर्षस्थ नेते कधीच घेत नाहीत. राहुल हे मात्र या त्या निमित्ताने संघावर टीका करीत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची मानहानी केली, बदनामी केली, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्या विरोधातील याचिकांची सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रातील भिवंडी येथील न्यायालयात खटला सुरू आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर महात्मा गांधी यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. संघ आणि भाजपशी त्यांचा वैचारिक लढा आहे, असे राहुल सांगतात आणि ते देशातील प्रादेशिक पक्षांनाही या कामासाठी सक्षम मानत नाहीत. कारण प्रादेशिक पक्षांची कोणतीही विचारधारा नाही, असे त्यांचे मत आहे. राहुल हे संघाचे कट्टर विरोधक असूनही संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांना राहुल यांना चर्चेसाठी का निमंत्रण दिले असा प्रश्न पडणे स्वाभावीक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना बोलावून त्यांच्यांशी चर्चा करण्याचा प्रघात आहे, असे कारण त्यासाठी पुढे केले जाते. प्रणव मुखर्जी यांच्यासह अनेक नेत्यांना संघाने नागपूरला बोलवून त्यांच्यांशी चर्चा केली. संघाचे लोक सर्वांना भेटत राहतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही संघाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात असले, तरी ते राहुल यांच्या भूमिकेवरून ते संघाच्या लोकांना भेटायला कधी तयार होतील असे वाटत नाही. जून २०१८ मध्ये संघाच्या निमंत्रणावरून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात एका कार्यक्रमाला गेले होते. प्रणव मुखर्जी नागपुरात जाण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जीही या गोष्टीवर नाराज होत्या. अशा परिस्थितीत होसाबळे यांना काही विशेष संकेत मिळाला आहे का? की संघाने फक्त काँग्रेससाठी जाळे टाकले आहे? संघाला राहुल गांधींना भेटण्याची इच्छा का आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मथुरा येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात होसाबळे यांनी राहुल गांधींबद्दल सांगितले, ‘तुम्हाला द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान चालवायचे आहे; पण भेटायचे नाही. आम्हाला भेटायचे आहे.’ पण राहुल गांधींना अशा गोष्टी अजिबात मान्य नाहीत. ते अनेकदा म्हणतात, की मी कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही. तुम्ही माझा गळा कापला तरी. यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. होसाबळे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संघ आणि भाजपमधील मतभेदांच्या वृत्तावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ही बाब समोर आली. होसाबळे म्हणाले, ‘आम्ही प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटतो… प्रत्येक उद्योगपती, प्रत्येक समाजातील नेते… आमचे कोणाशीही भांडण नाही, मग ते भाजपचे नेते असोत, काँग्रेस असोत किंवा इतर संघटनांचे प्रतिनिधी; मला इथे नावे घ्यायची नाहीत. कारण ती वेगळी बातमी होईल.’ राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी या संघ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे दाखले अनेकदा दिले जातात. ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड’ या पुस्तकात संघ आणि इंदिरा गांधी यांच्यातील संबंधांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. इंदिरा गांधी आणि संघाच्या अनेक नेत्यांचे चांगले संबंध असले, तरी वैयक्तिकरित्या दोन्ही बाजूंपासून काही अंतर राखले गेले होते, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. संघाच्या नेत्यांनी मदतीसाठी इंदिरा गांधींकडे संपर्क साधला होता आणि त्या बदल्यात माजी पंतप्रधानांनी त्यांच्या सोयीनुसार संबंध वापरले होते. हे मैत्रीपूर्ण संबंध आणीबाणीच्या काळातही दोन्ही बाजूंपर्यंत कायम राहिले, असे या पुस्तकात म्हटले आहे.
तत्कालीन संघप्रमुख बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधी यांना अनेकवेळा पत्रे लिहिली होती. संघाच्या काही नेत्यांनी कपिल मोहन यांच्या माध्यमातून संजय गांधी यांच्याशीही संपर्क साधला होता. काँग्रेसप्रती मुस्लिम समाजातील नाराजी या भीतीने इंदिरा गांधींना त्यांच्या राजकारणाला हिंदुत्वाचा स्पर्श द्यायचा होता. संघाचा चपखल पाठिंबा किंवा तटस्थताही उपयोगी पडू शकते, याचे भान इंजिराजींना होते. राहुल गांधी यांची भूमिका इंदिराजीपेक्षा वेगळी आहे. राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांचे संघाविषयीचे विचार अजिबात जुळत नाहीत आणि याला दोघांच्या राजकीय भूमिकेतील तफावतही कारणीभूत आहे. इंदिरा गांधी सत्तेत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे आणि राहुल गांधी सतत सत्ता मिळवण्यासाठी धडपडत आहेत. इंदिरा गांधींच्या काळात हिंदूंमध्ये कणखर नेतृत्वाचा अभाव होता. अशा स्थितीत इंदिराजींना संघाच्या माध्यमातून हिंदूंमध्येही प्रवेश करायचा होता. त्यात त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाल्या; पण राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व अशा वेळी केले, जेव्हा हिंदूंकडे भाजप, विशेषत: मोदींसारखे कणखर नेतृत्व होते. राहुल यांचे संघ आणि संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येपासून स्वतःला दूर ठेवू इच्छिणाऱ्या अशा हिंदूंवर लक्ष असते. इंदिरा गांधींना संघाच्या माध्यमातून हिंदूंशी जोडायचे होते, तर राहुल यांना संघाच्या पलीकडे जायचे होते. सत्तेत आल्यानंतर राहुल गांधींचा संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे; पण सध्या तरी ते अजिबात शक्य दिसत नाही. संघाच्या नेत्यांनाही त्यांना भेटावेसे वाटत नाही. राहुल गांधी आपल्या भाषणात प्रेमाचे दुकान उघडण्याचे बोलतात; पण संघाच्या बाबतीत त्यांची विषपेरणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे संघ आणि राहुल यांच्यातील संबंध सुधारणार नाहीत. २००४ मध्ये संघाने काँग्रेसबाबत वेगळा विचार केला होता. मोदी यांच्यासारखा कडवा हिंदुत्ववादी नेता पंतप्रधान असताना त्यांना पर्याय देण्याची गरज संघाला वाटत नाही. अशा परिस्थितीत संघाने राहुल यांच्याभोवती चर्चेचे जाळे टाकले आहे. या जाळ्यात राहुल अडकणार नसले, तरी त्याचाचाही उपयोग संघ राहुल यांच्यावर टीकेसाठी करू शकतो. प्रेमाचे दुकान उघडता आणि आमच्या प्रेमाचा स्वीकार न करता विष ओकता, अशी टीका करायला संघाला मोकळीक मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *