नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता विविध माध्यमांतून मतदार जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकांशी थेट संवाद साधला जात आहे.

या अनुषंगाने नवी मुंबईतील 150 ऐरोली व 151 बेलापूर या दोन्ही मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महापे येथील प्रादेशिक कार्यालयास भेट देत एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उद्योग समुहांच्या बैठकीप्रसंगी मतदान करणेविषयी उपस्थितांशी संवाद साधला.

यामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून यादिवशी उद्योगसमुहांमधील कामगार व कर्मचा-यांना सुट्टी द्यावी व ज्या कर्मचा-यांना सुट्टी देणे शक्य नसेल त्यांना मतदान करण्यासाठी वेळेची सवलत द्यावी असे सूचित केले.

त्याचप्रमाणे उद्योगसमुहात काम करणारे सर्वच्या सर्व 100 टक्के कर्मचारी व कामगार मतदानाचा हक्क बजावतील अशाप्रकारे उद्योजकांनी व कंपनी व्यवस्थापनाने त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन करतानाच अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी जे उद्योग, कारखाने आपल्या 100 टक्के अधिकारी, कर्मचारी यांचे मतदान करून घेतील त्यांचा महानगरपालिकेमार्फत विशेष सन्मान करण्यात येईल असे सांगितले. त्याचप्रमाणे 75 टक्केपेक्षा अधिक मतदान करणा-या उद्योग, कंपन्यांनाही प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात येतील असे सूचित करण्यात आले.

राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून त्याची जाणीव उद्योगात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी व कामगारांना करून देऊन त्यांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे व सवलत द्यावी असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी केले. यावेळी उपस्थितांनी मतदानाची सामुहिक शपथ ग्रहण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *