मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदी भाजपाचा उमेदवार नक्की झाल्याने सुरवातीला उपमुख्यमंत्रीपदाला नाकार देणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्रीपदासोबत गृहखाते मिळावे असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरल्याने चर्चा लांबतेय असे सुत्रांचे म्हणणे आहे.
पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेच्या बाहेर न राहता सत्तेत राहून सरकार चालवावे, शिवसेना नेत्यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. तसेच जर उपमुख्यमंत्री पद देण्यात आले, तर ते देखील तुम्ही घ्यावे अशीही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांचा देखील मागणीला सकारात्मक प्रतिसाद असल्याचं बोललं जातं आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अमित शाह यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्रिमंडळाबाबतही चर्चा करतील असे सुत्रांनी सांगितले. भाजपा गृह आणि अर्थ ही दोन्ही खाते आपल्याकडे ठेवू इच्छित असल्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीन मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला जाहिर पाठींबा दिले आहे.