मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे.
विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झाला नाही, आज ९ सदस्य उपस्थित होते, आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.
महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत बैठक घेऊन गटनेता व प्रतोद यांची निवड केली होती. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही गटनेता, मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नियुक्ती जाहीर केली आहे.