मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
मुंबई : जय शंकर चौकने द्वितीय श्रेणीत, तर शिवकन्या मंडळाने कुमारी गटात मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पूर्व विभागात उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.मुंबई उपनगर कबड्डी असो.ने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जय शंकरने अश्वमेध प्रतिष्ठानचा दुबळा प्रतिकार ३४-१२ असा परतवून लावला. पहिल्या डावात १४-०८ अशी आघाडी घेणाऱ्या जय शंकरने दुसऱ्या डावात आणखी जोषपूर्ण खेळ करीत २४ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. सचिन जाधव, रोहित आरोटे या विजयाचे शिल्पकार ठरले. अश्वमेधच्या ओंकार मोरेची लढत दुसऱ्या डावात दुबळी ठरली.
शिवकन्या मंडळाने कुमारी गटात चेंबूर क्रीडा केंद्राला २४-१५ असे नमवित या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पूर्वार्धात ०९-११अशा पिछाडीवर पडलेल्या शिवकन्याने उत्तरार्धात आक्रमक खेळ करीत ९ गुणांनी सामना आपल्या बाजूने झुकविला. परी कोरी, मेहजबीन शेख यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. चेंबूरच्या देवयानी नवले, गुंजन सुवर्णा यांच्या प्रतिकार उत्तरार्धात कमी पडला. महिला गटात वंदे मातरम् ने आकाश स्पोर्टस् चा २२-०८ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली. प्रसिता पन्हाळकर, रिया निंबाळकर यांच्या झंझावाती खेळाने हा विजय सोपा केला. आकाशाची तनिष्का बद्रिके चमकली.
प्रथम श्रेणी पुरुषात शितलादेवी संघाने गुरुकृपा संघावर २५-१४ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. पुरुष द्वितीय श्रेणी गटात शिवरदेवने शिव मराठाचा १७-१५ असा, तर संघर्षाने के.आर. टी. चा २०-०९ असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली.
००००
