महावितरणचा उपक्रम; १०२ बाटल्या रक्त संकलन

 

कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महावितरणच्या उल्हासनगर एक, दोन व बदलापूर विभागाकडून आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवताना १०२ अधिकारी, अभियंते व जनमित्रांनी रक्तदान करत महामानवाला अभिवादन केले.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे तसेच कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अंबरनाथ तहसिल कार्यालयाशेजारील महावितरणच्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागीय कार्यालयात रक्तदान आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने, उल्हासनगर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्यासह १०२ अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उल्हासनगर एक आणि दोन तसेच बदलापूर विभाग कार्यालय, विविध कामगार संघटना प्रतिनिधी, अभियंते, जनमित्र यांच्या पुढाकारातून आणि साई सिटी हॉस्पिटल तसेच अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात आले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *