अनिल ठाणेकर

ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष तरतुदी अंतर्गत महापालिकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळते. त्या अंतर्गत, ठाणे, भिवंडी-निजामपूर मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी, नवीन पंप हाऊसचे बांधकाम, नवीन जलवाहिनी टाकणे आणि जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे या कामासाठी २७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीस ऑक्टोबर २०२४मध्ये मान्यता दिली. तांत्रिक मान्यता होऊन सुमारे तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठपुरावा केला. स्टेम अंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्राची वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी यांचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात आला असला तरी ते काम दीड वर्षातच पूर्ण करावे. त्यामुळे या परिसराला कोणत्याही अडथळ्याशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच, भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणे शक्य होईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. या शुभारंभ प्रसंगी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन पंप हाऊसमुळे पाणी उचलण्याची क्षमता तर वाढेलच. शिवाय नवीन जलवाहिनी अंथरल्यामुळे पाण्याची गळती तसेच घट कमी होईल. तसेच, सध्या नऊ पंप चालवून पाणी उचलावे लागते. नवीन व्यवस्थेत सहा पंप चालवावे लागतील. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांनी व्यक्त केला. स्टेम कंपनीकडून सध्या ३०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे ठाणे महापालिका भिवंडी निजामपूर महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका तसेच जिल्हा परिषद क्षेत्रातील काही गावे यांना वितरण करण्यात येते. उल्हास नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचे पंप हाऊस आणि जलवाहिनी यांचे बांधकाम १९८५मध्ये करण्यात आले. कालमानाप्रमाणे हे पंप हाऊस जुने झाले असून जलवाहिन्याही जुन्या झाल्या आहेत त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी नवीन आणि जास्त क्षमतेचे पंप हाऊस तसेच जलवाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. १. शहाड येथे उल्हास नदीच्या पात्राशेजारी ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस बांधणे. २. शहाड ते टेमघर अशी ०९ किलोमीटर अंतराची अशुद्ध पाणी वाहून देणारी जलवाहिनी अंथरणे. ३. टेमघर ते माणकोली मुख्य वितरण टाकी अशी तीन किलोमीटरची शुद्ध पाण्याची जलवाहिनी अंथरणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *