स्वाती घोसाळकर
मुंबई: शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन्ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या प्रगति परिक्षेत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात नव्या पाच जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अजून खोतकर, विजय शिवतारे यांची नावे असल्याचे सुत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
ओवळा मजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, महाडचे भरत गोगावले, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान आमदार संजय राठोड यांनी पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे जो निर्णय देतील तो मान्य असेल असं वक्तव्य केलं आहे. मला माझ्या मतदारसंघातील जनतेने पाचव्यांदा निवडून पाठवले आहे. मी माझ्या मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्यांनी मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे, म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मागील सरकारमध्ये मंत्री असलेले उदय सामंत, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दादा भुसे, दिपक केसरकर, या मंत्र्यांना पुन्हा संधि मिळेल असे सुत्रांचे म्हणणे आहे.