– दोन लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी , महावितरणचे स्पष्टीकरण

कल्याण: बदलापूर पश्चिमेतील प्राईम बालाजी हाईट्स या सोसायटीकडे वीजबिलाची २ लाख ४६ हजार रुपयांहून अधिकची रक्कम थकीत आहे. रितसर नोटिस देऊन वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सोसायटीकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटी झाल्याचा अपप्रचार झाला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यानीच टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्याची ग्वाही देत दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतरच सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
बदलापूर गाव पश्चिम येथे न्यू डीपी रोड परिसरात प्राईम बालाजी हाइट्स या सोसायटीला सामान्य वापरासाठी (लिफ्ट, अंतर्गत पथदिवे आणि पाणीपंप) महावितरणने मे २०१८ मध्ये वीजपुरवठा दिला आहे. मार्च-२०२४ नंतर सोसायटीने या वीजजोडणीचे बिल भरलेले नाही. थकीत वीजबिलाचा भरणा करण्याबाबत सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याबाबत लेखी नोटीसही बजावण्यात आली. परंतू सोसायटीने थकबाकीचा भरणा केला नाही. त्यामुळे सोसायटीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी जमलेल्या सोसायटीधारकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणाऱ्या शाखा अभियंत्यांच्या कामात अडथळा आणला. उलट महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा कांगावा करत अपप्रचार केला.
शाखा अभियंत्यांनी यासंदर्भात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता सोसायटी पदाधिकारी बाबु तांबे व इतरांनी संपर्क साधून थकबाकी भरण्याचे मान्य केले. प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे दोन धनादेश तातडीने देत उर्वरित थकबाकी लवकर भरण्याची ग्वाही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमक्ष दिली. त्यानंतर सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *