निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने

ठाणे : समाजात अंमली पदार्थांचा वापर टाळण्यासाठी व युवा पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे. ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, परदेशातून येणारी पार्सल, गांजाची लागवड होणारी ठिकाणी आदी ठिकाणांवर लक्ष ठेवून वारंवार तपासणी करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कृती समितीची बैठक आज डॉ. माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी ठाणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक (गृह) तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल म्हस्के, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस निरीक्षक अमर मराठे, नशाबंदी मंडळाचे रविंद्र गुरचळ यांच्यासह अन्न व औषध प्रशासन, कृषि, टपाल विभाग, औद्योगिक सुरक्षा विभाग, शिक्षण विभाग, वन विभाग व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे ग्रामीण पोलीसांनी सन 2024 मध्ये सुमारे 2 लाख 37 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. तर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध एकूण 147 गुन्हे दाखल केले असून 177 आरोपींना अटक केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानेही अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
डॉ. माने म्हणाले की, जिल्ह्यात अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी बंद कारखाने/गोडावून, रासायनिक कंपन्या, व्यसनमुक्ती केंद्रे यांची तपासणी करून अहवाल सादर करावा. ज्यांच्याविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत, अशांची माहिती एकत्रित करून त्यांच्यावर लक्ष ठेवावे. अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्या परदेशी नागरिकांवर विशेष लक्ष ठेवावे. तसेच कुरिअर, टपालामार्फत बाहेरून येणाऱ्या पार्सलची तपासणी करण्यात यावे.
समाजातील अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच ग्रामीण भागात जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. माने यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *