अनिल ठाणेकर
ठाणे : कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने, समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ८८ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार २३ होती तर नोव्हेंबर २०२४ रोजी अखेर (तीव्र कुपोषित) सॅम २२ तर मध्यम कुपोषित (मॅम) ६२ कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम १ हजार ६४७ अंगणवाडीतील ८३ हजार ४२७ बालकांसाठी राबवण्यात येत आहे. तसेच दत्तक पालक योजना, पालकसभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ठ आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबई सारख्या नामांकित संस्थाचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडीओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे. गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बाळंतवीडा, कुपोषित मुलांना पोषकवडी, स्तनदा मातांना पाळणा इ. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर विविध स्वंयसेवी संस्था (उदा.स्नेहा फाऊंडेशन, अन्नदा फाऊंडेशन इ.) च्या मदतीने डोळखांब/ शहापूर प्रकल्पातील कुपोषित बालकासाठी कामकाज करण्यात येत आहे. परिणामी प्रतीवर्ष कुपोषीत बालकांमध्ये सुधारणा टक्केवारीत वाढ होत आहे.
चौकट
जिल्ह्यातील मागील तीन महिन्यातील कुपोषित बालकांची संख्या :
सप्टेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ८८ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार २३, ऑक्टोबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ७६ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार ९, नोव्हेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ६६ तर मध्यम कुपोषित (मॅम) ९६१ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *