मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती

ठाणे : विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल -२०२५ हा सांस्कृतिक महोत्सव १० ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान उपवन तलाव येथे संपन्न होणार आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य आणि वाद्य यांचा अनोखा संगम अनुभवायास मिळणार आहे, अशी माहिती या फेस्टिव्हलचे चेअरमन, आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या दोन प्रमुख प्रवेशद्वारास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ नावे देण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना या फेस्टिव्हलमध्ये अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. फेस्टिव्हल यावर्षी आकर्षक आणि बहूरंगी स्वरुपात साजरा केला जाणार आहे. तरंग स्टेज, मुद्रा स्टेज, विरासत स्टेज असे विविध रंगमंच कलाविष्कारासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फेस्टिव्हलमध्ये स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन, खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, कार्यशाळा, विविध मनोरंजनात्मक उपक्रम यांचा समावेश असणार आहे. पद्मश्री शुभा मुदगल, विदूषी आरती अंकलीकर टिकेकर, पंडित रितेश- रजनीश मिश्रा, संजू राठोड, अभिजित भट्टाचार्य, पंडित ब्रिज नारायण, केतकी माटेगावकर, पद्मश्री शाहीद परवेज, मिका सिंग, रणजित रजवाडा आदी मान्यवर गायक, वादक, विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये आपली कला सादर करणार आहेत. कुचिपुडी, भरतनाट्यम, ओडीसी,  मणिपूरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबरच विविध राज्यांतील लोकनृत्याचा आनंदही रसिक प्रेक्षकांना येथे घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे बदलत्या ठाण्याचा अनुभवही यावेळी घेता येणार आहे. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल हा ठाणेकरांसाठी महत्वाचा सांस्कृतिक सोहळा असून यंदा हा फेस्टिव्हल अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हल च्या माध्यमातून ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक गडद होईल. तसेच पर्यटकांचे आकर्षणही वाढेल. यामुळेच सर्व ठाणेकरांनी व पर्यटकांनी या फेस्टिव्हल मध्ये आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *