भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची माहिती
ठाणे : भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाण्यातील नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक दाखला आणि डोमिसाईल प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे भरविण्यात येत आहेत. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.
शहरातील शेकडो नागरिकांना विविध दाखले मिळविण्याची प्रक्रिया माहिती नाही. त्यामुळे नागरिकांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी शहराच्या सर्व भागात शिबिरे भरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ व १५ डिसेंबर रोजी वृंदावन सोसायटी, १७ ते १९ डिसेंबर लोकमान्य नगर, २० ते २२ डिसेंबर रोजी आनंदनगर, २४ ते २९ डिसेंबरपर्यंत वागळे इस्टेट, ३ ते ५ जानेवारीपर्यंत पाचपाखाडीतील परमार्थ निकेतन येथे, ७ ते ९ जानेवारीपर्यंत कळवा स्टेशन, १४ ते १६ जानेवारीपर्यंत मुंब्रा येथील बाळासाहेब पाटील विद्यामंदिर येथे, २१ ते २३ जानेवारीपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या परिसरात, २४ ते २६ जानेवारीपर्यंत दिवा-दातिवली येथे, २८ ते ३० जानेवारीपर्यंत दिवा स्टेशन परिसरात शिबीर भरणार आहे. या शिबिराला भेट देऊन नागरिकांनी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे.
