मुंबई : नेहरू सेंटर सर्क्युलर कलादालनात सहा ललित कलाकारांच्या एकत्रित कलाकृतींचे ‘अनंत’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ॲक्रेलिक व तैलरंगातील रचनात्मक कलाकृती इथे मांडण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास आपल्या कुशल कुंचल्यातून, शिवप्रेमींसाठी आकाश हाडवळे यांनी चितारला आहे. एक अनोखा कलाविष्कार बाबाजी कदम यांच्या चित्रांतून पाहायला मिळेल. निसर्ग व रुद्र अनुभव एका अनोख्या आकृतीबंधात, वेगळ्या पोतात राजय बोंगाळे हे सादर करत आहेत. गुढता हा कलेचा अविभाज्य भाग ही दिशा मिस्त्री हिच्या चित्रांची खासियत असून, ग्रामीण जीवनाची सफर मयूर पालकर यांच्या चित्रांतून घडून येते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित महत्त्वपूर्ण प्रसंग किरण होवाळ यांनी साकारले आहेत. कलादालनात आज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.