अक्कलकोट- ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री.स्वामी समर्थ महाराज की जय’ च्या जय घोषात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहनराव (गुरुजी) पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली. यानंतर मंदीर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी ११:३० वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेले स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली. यामध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, घाटकोपर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे, इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली होती. पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत दिवसभरात हजारो स्वामीभक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी मंदिर परिसर व मुरलीधर मंदिर परिसरात
कापडी मंडप, दर्शन रांग मंडप, बॅरेकेटींग लाईनच्या माध्यमातून मंदिर समिती व पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या राबविलेल्या विशेष दर्शन रांगेच्या नियोजनातून हजारो भाविकांनी नेत्र सुखद स्वामी दर्शनाचा अनुभव घेतला. दर्शन रांगेत भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना नियोजनात्मक रांगेत दर्शनास सोडण्यात आले. भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्त जन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी ६ वाजता पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते (जन्म सोहळा) पाळणा पूजन व चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती संपन्न होवून असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, मोहन जाधव, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, शिवशरण अचलेर, सुहास पाटील, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, प्रदीप हिंडोळे, महादेव तेली, स्वामीनाथ लोणारी, गणेश इंगळे, नरेंद्र शिर्के, सचिन हन्नूरे, संजय पवार, दीपक गवळी, सागर दळवी, शिवाजी यादव, लखन सुरवसे, रमेश होमकर, सचिन जाधव, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर सोनार, ज्ञानेश्वर भोसले, मंगेश फुटाणे, चंद्रकांत गवंडी, विपूल जाधव, महेश काटकर आदी उपस्थित होते.
00000