अमित शाहांचा काँग्रेसवर घणाघात

भंडारा : अवघा देश आज बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती साजरी करत आहे. या महामानावाचा निवडणूकीत पराभव करण्यासाठी त्यावेळी ज्या काँग्रेसने जंग जंग पछाडले आज तीच काँग्रेस बाबासाहेबांच्या नावाने मत मागत आहे. हा त्यांचा बेगडीपण आहे अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील साकोलीमध्ये सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमित शाह बोलत होते.

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका,70 वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत मोफत उपचार, घराघरात पाईप गॅस जोडणी, गरीबांच्या घरात मोफत वीज, प्रत्येक क्षेत्रात युवकांचे भविष्य उजळणाऱ्या लाखो संधी, महिलांना आर्थिक समृद्धी, समृद्ध, संपन्न भारत हा मोदी सरकारचा संकल्प आहे. यासाठीच मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपद द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी केले.

मोदी सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळात एक कोटी महिलांचे आयुष्य लखपती दीदी योजनेतून उजळले, नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी पंतप्रधान होतील, तेव्हा देशातील तीन कोटी महिला लखपती दीदी बनतील हा मोदी सरकारचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते .

भाजपा सत्तेवर आल्यास आरक्षण संपुष्टात आणणार असा संभ्रम जनतेमध्ये काँग्रेसकडून पसरविला जात आहे, आमच्याकडे बहुमत आहे, पण आम्ही बहुमताचा उपयोग कधीही आरक्षण हटविण्यासाठी केला नाही, पण कलम 370, तिहेरी तलाक हटविण्यासाठी निश्चितच केला. जोपर्यंत भाजपा  सत्तेवर आहे, तोवर आरक्षण रद्द करणार नाही आणि रद्द करू दिले जाणार नाही ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे, असे शाह म्हणाले.

उद्धव ठाकरे, शरद पवार पक्ष फोडल्याबद्दल भाजपा ला दूषणे देतात. हे काम आम्ही नाही, तर उद्धवच्या पुत्राने, पवारांच्या कन्येने केले. आज अर्धी शिवसेना, अर्धी एनसीपी आणि त्यांनी बनविलेली अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचे काय भले करणार, असा सवालही त्यांनी केला.

मोदी सरकार हे परिवर्तनाचे पर्व-उपमुख्यमंत्री फडणवीस

शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, महिला, युवक आणि समाजाच्या प्रत्येक घटकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाने केले आहे. राहुल गांधींच्या पक्षाने साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण ओबीसी समाजासाठी त्यांनी काय केले, मोदींनी गेल्या दहा वर्षांत जे काम केले, ते राहुल गांधींच्या पक्षाने साठ वर्षात केले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *