हरिभाऊ लाखे

नाशिक : कमीत कमी वेळेत नागरिकांची कामे होण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. इ कार्यालय सुरू करून काही कामांचे कक्ष कमी केले जातील. ऑनलाईन कामांवर अधिकतम भर देऊन प्रशासकीय कामात शिस्त आणली जाईल. वर्षभरात कामकाजात सुधारणा करून महानगरपालिकेची बदललेली प्रतिमा नाशिककरांना पाहण्यास मिळेल, असा विश्वास नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी व्यक्त केला.
मागील तीन दिवसात महापालिकेत मनपा आयुक्तांच्या बदलीचे नाट्य रंगले होते. शासनाने वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची केलेली नियुक्ती रद्द करुन या पदावर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनिषा खत्री यांची नियुक्ती केली. शुक्रवारी सकाळी खत्री यांनी मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्वच्छता, पाणी, लसीकरण, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. दाखले, बांधकाम परवानग्या अशा कोणत्याही कामास वेळ लागणार नाही, फाईल प्रलंबित राहणार नाही, याकडे लक्ष दिले जाणार आहे. आयुक्तांची बदली झाली की, संगणकीय आज्ञावली बंद होते. परंतु, आता कामकाजासाठी शासनाच्या आज्ञावलींचा वापर केला जाईल.
आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा अनुभव व संकल्पनांचा महापालिका उपयोग करून घेईल. सर्वांच्या मार्गदर्शनाने सिंहस्थाचे काम केले जाईल. शासनाकडे पाठपुरावा करून नोकरी भरतीचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील काळात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून सकारात्मकतेने कामे केली जातील. इंदूरपेक्षा नाशिक शहर सुंदर करायचे आहे. वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, गोदावरी प्रदूषण या विषयावर प्राधान्यक्रमाने कामे केली जातील. भूसंपादन घोटाळ्याबाबत शासन निर्देशानुसार काम केले जाईल, असे खत्री यांनी स्पष्ट केले.
खातेप्रमुखांना सूचना
शहर विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर असणारे प्रकल्प सुरू ठेवले जातील. खातेप्रमुखांनी कामकाजात पारदर्शकता ठेवावी. प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणींबाबत थेट आपल्याशी संपर्क साधावा. शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी खातेप्रमुखांशी झालेल्या बैठकीत दिले. नागरिकांच्या प्रतिक्रिया व अभिप्राय याचा अभ्यास करून त्यानुसार कामकाज करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन संकल्पना राबविणार असल्याचे खत्री यांनी नमूद केले. बैठकीनंतर त्यांनी राजीव गांधी भवन मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. अनुपस्थित अधिकाऱ्यांबद्दल विचारणा केली. रजा देण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, हे देखील जाणून घेतले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *