बदलापूर : दिमाखदार लग्न सोहळ्यासोबतच गेल्या काही वर्षात प्री-वेडींग अर्थात लग्नपूर्व चित्रण करण्याची पद्धत वाढली. यात मोठा पैसा खर्च होतो. तसेच हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे आगरी विवाहांमध्ये असे चित्रण दाखवणाऱ्यांच्या लग्नातून काढता पाय घेतला जाईल, असा निर्णय आगरी समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. बदलापुरात नुकताच आगरी महोत्सव पार पडला. या निमित्ताने आगरी समाज परिषदेत दोन महत्वाचे ठराव करण्यात आले. प्री वेडींग चित्रीकरणासोबतच लग्न निमंत्रणासोबत साडी देण्याची खर्चीक प्रथाही बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
बदलापुर आगरी समाज संघटना आणि वामन म्हात्रे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी महोत्सव – २०२४ चे आयोजन २७ ते २९ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून आयोजीत केल्या जाणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने आगरी समाजाच्या परंपरा, संस्कृतीचे दर्शन होत असते. गेल्या तीन दिवसात मोहीत चौहानपासून अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या महोत्सवाला भेट दिली. खाद्य संस्कृतीसोबतच खेळणी – पाळण्यांमुळे येथे बदलापुर आणि आसपासच्या भागातून मोठा प्रतिसाद मिळत असतो. आगरी समाजाती जुन्या आणि चुकीच्या प्रथांवरही या महोत्सवाच्या निमित्ताने बोट ठेवले जाते आहे. यंदाच्या महोत्सवात आगरी परिषदेच्या निमित्ताने दोन नवे ठराव करण्यात आले. यातील सर्वात महत्वाचा ठराव ठरला तो प्रीवेडींग शुटचा.
लग्न सोहळ्यांमध्ये लग्नाआधी दाखवले जाणारे ही प्रीवेडींग शुट आपल्या संस्कृतीला साजेसे नसते. तसेच यात मोठा पैसाही खर्च होत असतो. त्यामुळे काही चुकीचे पायंडे पडण्याआधी हे प्रकार बंद केले पाहिजेत, असा ठराव करत असल्याची घोषणा यावेळी शरद म्हात्रे यांनी केली. यावेळी आगरी महोत्सवाचे सर्वेसर्वा आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेही उपस्थित होते. असे करणाऱ्या आगरी बांधवाच्या लग्नातून काढता पाय घेतला जाईल, असेही म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. यासोबतच गेल्या काही वर्षात लग्नाच्या आमंत्रणावेळी साडी चोळी देण्याची पद्धत वाढली आहे. यासाठी पैसे वाया जातात. तर त्या साडीचा वापरही केला जात नाही. एखाद्या गरीब आगरी बांधवाला हे परवडणारे नाही, त्यामुळे ही पद्धतही थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे. या दोन निर्णयांनंतर आगरी समाजातून स्वागत केले जाते आहे.
तर जन्मदिनही साधेपणानेच करणार
या दोन महत्वाच्या ठरावानंतर वामन म्हात्रे यांनी आपण येत्या काळात वाढदिवसही अगदी साधेपणानेच साजरा करणार असल्याची घोषणा केली. आदिवासी बांधवांमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करणार असेही यावेळी म्हात्रे यांनी जाहीर केले. गेल्या काही वर्षात जन्मदिन साजरा करणे म्हणजे राजकीय ताकद दाखवणे असा प्रघात झाला आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *