दिव्यातील आरंभ इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात

आरती परब

दिवा : जय भोले शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या आरंभ इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह सम्मेलन विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मोठ्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केलेल्या राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. त्यानंतर सरस्वती गीताच्या सुमधुर स्वरात दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी शिवसेना युवती अधिकारी साक्षी मढवी, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, जयदास शेलार (शाळेचे उपाध्यक्ष), महेश माळी (शाळेचे संस्थापक- अध्यक्ष), विवेक म्हात्रे, विनोद पाटील, तसेच मुख्याध्यापक केतकी ओव्हाळ हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यानंतर जयदास शेलार, केतकी ओव्हाळ आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन चौबे यांच्या प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमाला दिशा दिली. कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून “आरंभ – नव्या पर्वाची सुरुवात” या पुस्तकाचे पाहुण्यांच्या हस्ते दिमाखदार प्रकाशन करण्यात आले. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, शिवसेना युवती अधिकारी साक्षी मढवी आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन चौबे यांच्या हस्ते करण्यात आला.

आरंभ इंग्लिश स्कूलमधील सेमी- इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. सामाजिक विषयांचे भान ठेवून सादर करण्यात आलेली नाट्य व नृत्ये, तसेच आपल्या संस्कृतीचा वारसा जपत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी माहिती देणारी सादरीकरणे उपस्थितांची मने जिंकून गेली. याचबरोबर शिक्षकांनी “मुली वाचवा, मुली शिकवा” हा सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका केतकी ओव्हाळ यांनी सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्यानंतर राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *